Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

निसर्ग संपदा

सह्याद्री पर्वत रांगेतील उपरांग असलेला जयाद्री निसर्गाने समृद्ध असलेला प्रदेश मागील काही पिढ्यांमध्ये दुर्लक्ष झाल्याने पर्यावरणाचा बराच -हास झालेला आहे, बेसुमार वृक्ष तोडीने डोंगर रांगा उजाड पडल्या आहेत.या परीसरातील विविध पक्षी प्राणी आणि निसर्ग संपदा याविषयी थोडक्यात पण महत्वाचे......

 

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

अनाथांची आई सिंधुताई संपकाळ

सिंधुताई संपकाळ  

श्रीक्षेत्र जेजुरीपासून १८ किलोमीटरवर कुंभारवळण हे एक छोटेसे खेडेगाव आहे तेथे 'ममता बाल सदन' या नावाने सिंधुताई सपकाळ (माई) अनाथ आश्रम चालवितात. त्याची सर्व व्यवस्था माईंचा पाहिला मुलगा दीपक गायकवाड हे बघतात.  

Sindhutai Sapkal

 गोष्ट १९८८ - ८९ सालची आम्ही भावंडे तेव्हा पुण्यामध्ये शिकायला होतो, जेजुरी मध्ये आमच्या उपहारगृहा मध्ये वडिलांना मदतीसाठी आमची आई दुपारचे वेळी थांबत असे, तेव्हा नऊवारी साडीतील एक बाई आली लहान मुलांसाठी मदतीची याचना करू लागली तेव्हा आमच्या आईने तिची विचारपूस केली तेव्हा तिने आपली व्यथा सांगितली आणि आमच्या आईचे डोळे पाणावले. त्या महिलेला काही पैसे देऊन जेवण करण्याचा आग्रह केला परंतु " माझी लेकरं तिकडं उपाशी असताना मला घास गोड लागणार नाही " असं सांगून शब्दाला मान देत फक्त एक कप चहा घेतला. ती महिला निघून गेली पण आईच्या मनात घर करून गेली, पुढे अनेकदा ती आम्हाला त्या महिलेविषयी सांगत असे पण ती महिला म्हणजे नक्की कोण हे आम्हाला तेव्हा समजत नसे.

पुढे १९९५ च्या सुमारास 'म्हाळसाकांत गणेश मंडळा'च्या वतीने जेजुरीमध्ये सिंधुताई सपकाळ अर्थात माईंना  बोलाविले होते, तेव्हा माईंचे गहिवरून आणणारे भाषण ऐकले आणि आमच्या आईने जिला आम्ही माई म्हणतो सांगितलेली महिलेची व्यथा ती सिंधुताईंचीच अर्थात माईंची होती.एका माईने सांगितलेली दुस-या माईची व्यथा जी अनेक दिवस मनामध्ये घर करून होती त्याची उकल झाली होती. त्यावेळी घडलेला आणखी एक किस्सा त्या कार्यक्रमाला माई त्यांच्या तीन चार मुलांसोबत आल्या होत्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था होती. जेवण झाल्यानानंतर लहान मुलाने आपला हात धुतला आणि हात पुसायला माईंचा पदर घेतला, त्या लहानग्याच्या या एका कृतीतून माईंनी लावलेला लळा दिसून येत होता जो फक्त आईच लावू शकतेपौराहित्य व्यवसायाच्या  माध्यमातून आम्ही कुलाचार आणि सामाजिक भान दोन्हींचा मेळ साधत आपला खारीचा वाटा म्हणून शक्य असेल तेव्हा धान्य आणि मुलांसाठी कपडे देत असतो. आपल्या घरामध्ये लग्न कार्य असते तेव्हा देवाला पोशाख ( वस्त्र ) देण्याची प्रथा असते त्यावेळी आम्ही भाविक भक्तांना लहान मोठ्या मुलांचे कपडे देण्यास सुचवितो कारण श्रीखंडोबा देवाला कुमार - कुमारी भक्ती प्रिय असल्याने आणि दिलेल्या वस्त्र दानाचा योग्य तो विनिमय होण्यासाठी आम्ही ते सर्व कपडे सिंधुताई सपकाळ यांच्या 'ममता बाल सदन' मध्ये देत असतो.

Sindhutai Sapkalमाई मुळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेलं. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरीमधी गावात आले. मुलीनं शिकावं अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. माई मुळच्याच बुद्धिमान, पण जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आलं. अल्पवयातच लग्न झालं आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात माईंचं वय होतं अकरा वर्षं आणि नवर्‍याचं वय तीस वर्षं. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बीळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात,"तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार्‍यांना मजुरी पण शेण काढणार्‍यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथं मी बंड पुकारलं. लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली."

माई हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती, आणि अडाणी गावकर्‍यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. गावकरी डोईजड होण्याची शक्यता होती. माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार मग दमडाजीनं सुरू केला. नवर्‍याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.
नवर्‍यानं हाकलल्यानंतर गावकर्‍यांनीही हाकललं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनंही पाठ फिरवली.

Sindhutai Sapkal

दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वेरुळांच्या कडेनं फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण 'लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल' म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं. त्या गायच्या,

ये ऊन किती कडक तापते
बाई अंगाची फुटते लाही
दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा
चालेल आम्हा वाढा
दार नका लावू
पुन्हा येणार नाही..
 

माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकार्‍यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच माईंना संरक्षण दिले. माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे. २१ वर्षांच्या होत्या माई तेव्हा. पण एक दिवस हे संरक्षणही संपले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नाही. त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही. वाट फुटेल तिथे माई चालत राहिल्या. आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंनी स्मशान गाठलं.

त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. मडकं फुटलं. पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे आशेने चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडं पीठ आणि सव्वा रुपया दिला. भिन्न काळोख दाटला होता. चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की 'दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता.' माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवले, आणि चितेवरच्या निखार्‍यावर भाजले. कडक भाकरी तशीच खाल्ली.

माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या, आणि भीक मागत, काम शोधत चिखलदर्‍याला पोहोचल्या. तिथे रस्ताबांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला. सकाळ-संध्याकाळ कुटकी (भात), डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक, या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलदर्‍याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला आले, आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या.

एकदा असंच पुण्यात कुठेसं रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. आपलं नाव 'दिपक गायकवाड' एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हती. त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलीसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी आठवडा पोलीस स्टेशनबाहेर बसून काढला पण पोलीसांनी तक्रारही नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिनाभरात अशीच २-३ मुलं त्यंना रस्त्यावर भीक मागताना भेटली, आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हे त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल, असं त्यांना वाटलं. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वतःचंच पोट तिथे भरलं जात नव्हतं, आणि आता जोडीला ४ मुलं होती. आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं.Sindhutai Sapkal 

त्यावेळी भारत-रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या होणार होत्या. या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजला होता. कडेकोट बंदोबस्त होता. माईंच्या लक्षात आलं की आपण इथे व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो तर इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनांत आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यंनी हळूच सभागृहात प्रवेश केला. झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. व्यासपीठावर एक काश्मिरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली. दुसरा वक्ता अजून उठायचा होता. त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषण सुरू केलं. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती.

कार्यक्रम संपला आणि श्री. सुनील दत्त समोर आले. त्यांनी माईंशी हस्तांदोलनच केले. माई थक्क झाल्या. सर्वजण माईंचं कौतुक करत होते, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. त्यांना भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं, 'खाना है क्या?' कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता. माई गेल्या आणि त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं. तिथेच जमिनीवर बसून जेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं.

त्या जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंच्या मुलीला, ममताला, सांभाळण्याची तयारी दाखवली, आणि ममता पुण्याच्या सेवासदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होताच. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं. त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसर्‍यांना सांभाळायला का दिलं?

Sindhutai Sapkalमाई सांगतात, "रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोसलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर? मी काय केलं असतं? ज्या मुलांना मी सांभाळणार होते, ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती. पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का? मला अन्याय करायचा नव्हता. म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता."

आकाशवाणीवर गाऊन माईंना ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले, आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदर्‍याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्‍याला आणली.

त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावांतील आदिवासी निर्वासित होणार होते, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर २-३ मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला, आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोजच लढाव्या लागत होत्या.

चिखलदर्‍याचा परिसर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला. 'तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो', म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणार्‍या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडाण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला, तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदर्‍यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशनर्‍यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच दोन हल्ले झाले. माई तरीही बधल्या नाहीत. मुंबईला निघाल्या असता त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला, आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.Sindhutai Sapkal

माईंचा पहिला मुलगा दिपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दिपकचा   उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलदर्‍यास आले. दिपकच् या  आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता, अनाथ नातवासाठी ठेवली होती. दिपकने आता आपल्या गावी परत जावं, अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती. पण दिपकने नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं, आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशनर्‍यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दिपक, माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट चिखलदर्‍यातून बाहेर पडला. आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात, आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर 'ममता बाल सदन' उभं राहिलं.

आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. १०४२ मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास परतल्या, आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज १०० मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे १५०० मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना ४०० सुना आणि २०० जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. 'माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत', हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदर्‍याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. त्या सांगतात,
"सर्वांनी, जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं. म्हणून मी गायीलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन, असं मी तिला वचन दिलंय." वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा, कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. ३० वर्षं राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषणं करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे.

Sindhutai Sapkal

गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. 'या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले', असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. "वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते".

 

माईंनी आता साठी ओलांडली आहे. दिपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांचं बरचसं काम आता सांभाळतात. ममताने MSW केलं आहे. 'सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं, आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं', म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल, याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल ठाऊक आहे. माईंनी उभ्या केलेल्या पसार्‍याचा तिला प्रचंड अभिमान आहे.

 

ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असतात. 'स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी 'सत्या' झाला आहे का?' विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई 'वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा', हे असं सहजपणे सांगून जातात. 'चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज  अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही.  मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट  आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.'Sindhutai Sapkal

माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजवर दोनशेच्या वर  पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं, त्या पिंपरीमधीच्या गा  कर्‍यांनी माईंचं कौतुक केलं, आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळेच आज गावकर्‍यांना शेणासाठी महिना हजार रुपये तरी मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलंय, याचा त्या गावकर्‍यांना अभिमान आहे. 'जो गाव माझ्यावर थुंकला, तोच गाव माझ्या नावाने आज जयजयकार करतो. माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही नाही. पटत असेल तर रहा. माझ्या आश्रमातली मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात'.

'हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,' असं म्हणत न थकता माई काम करत असतात. कसल्यातरी विवंचना सतत असतातच. 'मला दोनशेच्यावर पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही'. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. 'गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही', असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.
माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. 'निराश्
Sindhutai Sapkalरित', 'बेवारस' असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. 'देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस', हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.

अलीकडच्या काळात प्रगत प्रसार माध्यमांमुळे  घरोघरी माई परिचित होऊ लागल्या आहेत आणि अनंत महादेवन सारख्या दिग्दर्शकाने त्यांच्या जीवन कहाणीवर चित्रपट तयार केला आहे. फलटणच्या निंबाळकरांनी फिरण्यासाठी त्यांना गाडी दिली आहे. पण आजही कोणी पाच रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात,

निखार्‍यावरी दुर्दैवाच्या, पडली चिमणी पिलं,
कवटाळूनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं,
सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी,
चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी..

ममता बाल सदन ,
मु.पो. कुंभारवळण ता. पुरंदर जि. पुणे.

 



हुतात्मा हरी मकाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी.


www.jejuri.in परिवाराकडून जेजुरी येथे हुतात्मा हरी मकाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी.

बुधवार दिनांक ०४ एप्रिल २०१२ रोजी हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या हौतात्म्याला १३३ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने श्रीक्षेत्र जेजुरी येथील पुणे पंढरपूर रस्त्यालगत असणा-या हुतात्मा स्मारकामध्ये पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला. हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या कार्याची महती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या ठिकाणी माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या कार्याचे विस्मरण होऊ नये आणि शासनाने उभ्या केलेल्या हुतात्मा स्मारकामध्ये हरी मकाजी आणि उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिल्प उभारण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली.

 

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यदूतांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यदूतांचा गौरव
भारत सरकारच्या अधिकृत आरोग्य समाजसेविका अर्थात आशा म्हणून कार्यरत असताना आरोग्य सेवा जनसामान्यांपर्यंत घरोघरी पोहोचविण्याचे कार्य करणा-या आशा सेविकांना मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने गौरव पत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. वीणाताई सोनावणे होत्या तसेच जेजुरी नगरपरिषदेच्या महिला बालकल्याणच्या सभापती सौ. वृषालीताई कुंभार व नगरसेविका सौ शीतल बयास, सौ रुख्मिणी जगताप उपस्थित होत्या. पुरंदर तालुक्यतील दुर्गम भागातील परिंचे आणि जेजुरी बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणामध्ये सौ .वीणाताई सोनावणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, "दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना स्वच्छ, समृद्ध आणि आनंददायी जीवन जगता यावे म्हणून आशा जे कार्य करीत आहेत ते खरोखरच अभिमानास्पद आहे. आशा सेविकांमुळे समृद्ध व निरोगी भारत देश घडण्याच्या आपल्याला आशा आहेत.

घरातील अडचणी, दु:ख बाजूला ठेऊन ग्रामीण दुर्गम भागातील रंजलेल्या गांजलेल्या लोकांची आशा सेविका सेवा करतात हीच ख-या अर्थाने ईश्वरसेवा आणि देशसेवा आहे असे आम्हास वाटते. म्हणूनच या महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे असे मेघमल्हार प्रतिष्ठानने ठरविले आणि महिलादिनाचे औचित्य साधून आरोग्यदूत आशा सेविकांचा गौरव करण्यात आला असे मेघमल्हार प्रतिष्ठानचे उपाध्ये गुरुजी यांनी यावेळी सांगितले.
दुर्लक्षित असलेल्या गुणवंताचा गौरव करणे त्यासोबतच तळागाळातील विविध क्षेत्रातील कष्टकरी हातांना प्रोत्साहित करणे जेणेकरून त्यांच्या हातून घडणा-या समाजसेवेला आणि राष्ट्रसेवेला पाठबळ मिळेल म्हणून मेघमल्हार प्रतिष्ठान कार्यरत असते. गोरगरिबांना ब्लॅंकेट वाटप, वृक्षसंवर्धन, पर्यावरण रक्षणासाठी प्रबोधन, गुणवंतांचा गौरव, सांस्कृतिक व ऐतिहासिक वसा जपण्यासाठीचे विविध उपक्रम मेघमल्हार प्रतिष्ठान राबवत असते.

श्री.सुभाष इंदलकर यांनी प्रास्ताविक केले, आभार जेजुरी शहर नागरिक हक्क कृती समितीचे अध्यक्ष राहुल मंगवाणी यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ. स्वप्नाताई शेंडकर यांनी केले.

यावेळी राहुलराजे वीर, निलेशकुमार सटाले, सौ. भारती निरगुडे, सौ. सारिका दीक्षित, सौ. पूनम नेवसे, रणजित गुळवे, अजित हसबे आणि विशाल भोसले उपस्थित होते.

Bookmark and Share